*इतिहास आणि स्थापना (१९८३ - १९८७)*
।। श्री गजानन महाराज प्रसन्न ।।
सन १९८३ साली श्री गजानन महाराज (शेगांव) प्रेरणा मंडळ या नावाने संस्था स्थापन केली. त्यावेळी श्री गजानन महाराज यांची छोटी मूर्ती ठेवून श्री गजानन महाराज उद्यान, प्राधिकरण निगडी येथे अगदी छोटे मंदिर उभे करून सकाळी व संध्याकाळी पूजा अर्चा / आरती सुरू केली. औद्योगिक क्षेत्रातील काही सर्वजण या मंडळाचे सभासद झालो होतो. हळू हळू भक्तगण संख्या वाढू लागली आणि छोट्या प्रमाणात श्रींचा प्रगटदिन व पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येऊ लागला.
पुढे या ठिकाणी महाराजांचे मोठे मंदिर व्हावे ही कल्पना येऊ लागली. त्यासाठी निधी गोळा करणे आवश्यक होते. म्हणून सर्व सभासदांनी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे सुरू झाले. अगदी रु. ५ पासून लोकांनी देणगी देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर १९८७ साली श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट (रजि. नं. ओ १७६६७ पुणे) ची नोंदणी करून प्रेरणा मंडळ बरखास्त केले. आणि त्यानंतर महाराजांसाठी गाभारा शिखरासहित उभारण्याचे ठरविले. १६ फूट x १६ फूट साईजचे गाभाऱ्याचे काम सुरू केले. एका वर्षात काम पूर्ण करून ४० फूट x २० फुटाची गाभाऱ्यापुढे पत्र्याची शेड उभारून सभामंडप तयार केला. या सर्व कामासाठी आमच्या येथील नगरसेवक व भक्तगण यांनी खूप मदत केली.
पुढे श्रींची ४ फूट उंचीची संगमरवरी मूर्ती तयार करून घेतली. त्याची प्राणप्रतिष्ठापना ४ मे १९८९ साली श्री शंकराचार्य करवीर पीठ यांच्या हस्ते केली आणि कलशारोपणही त्यांच्याच हस्ते केले. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील व इतर मान्यवर हजर होते. मूर्ती प्राणप्रतिष्ठेवेळी अगोदर प्राधिकरणत मिरवणूक काढली.
* विस्तार आणि नियमित कार्यक्रम *
आणि त्याच दिवशी आर.सी.सी. च्या सभामंडपाचे भूमिपूजन डॉ. डी. वाय. पाटील यांचे हस्ते केले. व कामाला सुरुवात करून एका वर्षात पूर्ण केले. या सर्व कार्यक्रमासाठी डॉ. रामचंद्र देखणे साहेब यांनी खूप मोलाची मदत केली.
त्या दिवसापासून मंदिरामध्ये प्रगटदिन, समाधी दिन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात सुरू झाले. त्यावेळी श्री गजानन महाराज (शेगांव) यांची पायी वारी कार्तिक एकादशीसाठी आळंदीला येत होती. दशमी दिवशी सकाळी ही पालखी चिंचवडहून आपल्या या मंदिरात येऊ लागली. नंतर पालखीचा एक मुक्काम आपल्याकडे असून म्हणून प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी जागा असावी म्हणून प्राधिकरण सेक्टर २७ मध्ये एक सार्वजनिक सुविधा केंद्राचा प्लॉट (१० गुंठे) प्राधिकरणाकडून घेतला. आता त्या ठिकाणी चार मजली इमारत असून तिथे सामाजिक कार्यक्रमांतर्गत UPSC/MPSC विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका सुरू केलेली आहे.
*नित्यनेमाने चालणारे कार्यक्रम:-*
(टीप: एका ठिकाणी रोजनिशीत 'भक्तांच्या सोयीसाठी मुख्य मंदिराच्या पाठीमागे श्री गुरुदेव दत्त व शंकराचे छोटे मंदिर आहे' असाही उल्लेख आहे.)
वार्षिक उत्सव आणि सामाजिक उपक्रम
मंदिराचे वार्षिक उत्सव:
१) माघ वद्य सप्तमी - प्रगटदिन महोत्सव २) महाशिवरात्र - रुद्राभिषेक, कीर्तन ३) मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन - ४ मे ४) गुरुपौर्णिमा उत्सव ५) एस.एस.सी. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ६) १५ ऑगस्ट - सकाळी ८ ते ९ श्री गणपती अथर्वशीर्ष पठण ७) श्रावण मास / अधिक मास निमित्त कीर्तन, प्रवचन, ग्रंथ वाचन इत्यादी. ८) ऋषीपंचमी - श्री गजानन महाराज (शेगांव) पुण्यतिथी सोहळा ९) दत्त जयंती उत्सव
*ट्रस्टचे सामाजिक उपक्रम:*
रक्तदान शिबिर, गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत, नैसर्गिक आपत्तीकाळात आर्थिक साहाय्य, वृक्षारोपण, बालसंस्कार वर्ग, आरोग्य चिकित्सा शिबिर.
श्रींच्या भक्तगणांच्या सहकार्यामुळे अशा प्रकारची सेवा केली जाते. गण गण गणात बोते
Address:
Sector No 27, Shree Gajanan Maharaj Udyan,
Pradhikaran, Nigdi,
Pune, Maharashtra 411044
India
Phone: +91 96377 71110